www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्ली कोर्टानं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. आता पित्याला स्वत:च्या अनौरस अपत्याची जबाबदारी टाळता येणार नाहीय. मुलाच्या संगोपनासाठी त्यानं महिलेला पोटगी देणं अनिवार्य असणार आहे. दिल्ली कोर्टानं हा निर्णय दिलाय.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनुराधा शुक्ला भारद्वाज यांनी पित्याला अनौरस अपत्याच्या संगोपनासाठी दरमहा दोन हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश दिलाय. कायदेशीर अपत्याप्रमाणंच अनौरस अपत्यासही पोटगी देणं कायद्यानं बंधनकारक असल्याची बाब न्यायालयानं यावेळी त्या पित्याच्या लक्षात आणून दिली.
संबंधित मुलाची माता आणि आपल्यात यापूर्वीच काही बाबींवर सामंजस्य झाल्यानं आपण कोणतीही भरपाई देणार नाही, अशी भूमिका या पित्यानं कोर्टामध्ये घेतली होती. पण कोर्टानं हा दावा फेटाळून लावला.
आपल्या पत्नीस आपण पूर्वीच भरपाई म्हणून ५० हजारांची पोटगी दिली आहे. भविष्यात तिनं आणखी भरपाई मागू नये हाच या मागचा उद्देश होता, असा दावा संबंधित पतीनं केला होता. पण कोर्टानं ही बाब अमान्य केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.