नवी दिल्ली : तिरंग्याच्या डोअर मॅटच्या विक्रीला मोठा विरोध झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनने आपल्या वेबसाईटवरुन ही डोअर मॅट हटवलीत. पीटीआयच्या बातमीनुसार अमेरिकेच्या सिएटलस्थित अॅमेझॉन मुख्यालयाच्या प्रवक्त्याने वॉशिग्टन पोस्टला ही माहिती दिली.
अॅमेझॉनच्या कॅनडास्थित वेबसाईटवर तिरंग्याचे डोअर मॅट विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी याप्रकरणावर चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. यावर नाराजी व्यक्त करताना स्वराज यांनी वेबसाईटवरुन तातडीने या वस्तू हटवण्यात याव्यात तसेच बिनशर्त माफी मागावी असे म्हटले होते.
तसेच असे न केल्यास अॅमेझॉनच्या कोणत्याही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही तसेच ज्यांना दिला गेलाय त्यांचा व्हिसा रद्द करण्यात येईल अशी सक्त ताकीद दिली होती.
या विरोधानंतर अॅमेझॉनच्या साईटवरुन या वस्तू हटवण्यात आल्यात मात्र अद्याप अॅमेझॉनकडून कोणत्याही प्रकारे माफी मागण्यात आलेली नाही.