नवी दिल्ली : अंदमानात जारवा जमातीच्या नवजात बालकांच्या हत्या उजेडात आल्यात. या हत्या त्यांच्याच जमातीतील लोकांकडून होत आहेत... उल्लेखनीय म्हणजे, या मुद्यावर अंदमान पोलीस मात्र पेचात पडलेत... आपण या मुलांना वाचवण्याचे प्रयत्न करावे की त्यांना मारणाऱ्यांवर कारवाई करावी, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलाय.
जारवा जमातीतील परंपरा या चिमुरड्यांच्या हत्येमागील मूलभूत कारण आहे. आई विधवा असल्यास किंवा पिता जमातीच्या बाहेरचा असल्यास लहानग्या बालकांची याच जमातीतील लोकांकडून हत्या केली जाते.
जारवा जमातीतील लोकांचा रंग काळ ठिक्कर आहे. त्यामुळे, एखादं बाळ काळ्या रंगाचं नसल्यास त्याची आई सतत आपल्या बाळाची कुणाकडून तरी हत्या होईल, या धास्तीत असते. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक घटना उघडकीस आल्यात. मात्र, कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस परंपरा चालूच राहू द्यावी की कारवाई करावी? या पेचात पडलेत.
सरकारी आकड्यांनुसार, जवळपास ४०० जण या जमातातील आहे. अंदमान बेटावर उत्तर भागात या जमातीतील लोक राहतात. दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतर करत ही जमात ५० हजार वर्षांपू्र्वी इथंवर पोहचल्याचं समजलं जातं.
१९९० मध्ये पहिल्यांदा अशी काही जमात अस्तित्वात असल्याचं समोर आलं... आणि हे लोक बाहेरच्या जगाच्या संपर्कात आले. उल्लेखनीय म्हणजे, अंदमानच्या जारवा आदिवासी भागांमध्ये परदेशी किंवा बाहेरच्या व्यक्तींना येण्यास परवानगी नाही. परंतु, तरीही इथं बाहेरच्या व्यक्ती आल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या.
नुकतंच, एका जारवा अविवाहीत मुलीनं एका गोऱ्या रंगाच्या मुलाला जन्म दिला आणि त्यानंतर ही गोष्ट ढळढळीतपणे समोर आली. ही घटना म्हणजे, इथे बाहेरच्या व्यक्ती बेकायदेशीररित्या घुसून इथल्या महिलांचा वापर शारीरिक संबंधांसाठी करत असल्याचा पुरावा होती.
तसंच, जारवा महिलांचा एक व्हिडिओ उघडकीस आल्यानंतर, टूरिस्ट किंवा बाहेरच्या लोकांनी जारवा महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या. नग्न जारवा महिला बाहेरच्या लोकांसमोर नाचताना या व्हिडिओत दिसल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.