हैदराबाद : आंध्रप्रदेशमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ८०० कोटींची अनधिकृत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत विविध ठिकाणांहून ही संपत्ती जप्त करण्यात आलीये.
पूर्व गोदावरी येथील परिवहन विभागात काम करणाऱ्या ए. मोहन या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली होती. अटक केल्यानंतर मोहन यांच्या विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत विजयवाडा, अनंतपूर, कडपा, बेल्लारी, मेडक, नेल्लोर, प्रकाशम आणि हैदराबाद येथील ठिकाणांवर छापे टाकण्याची कारवाई सुरु होती. लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार अद्याप काही बँकातील १२ लॉकरची तपासणी होणे बाकी आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्यांनी आपली मुलगी तेजश्रीच्या नावे आठ कंपन्या सुरु केल्या होत्या. तसेच मोहन यांनी नुकतीच काही संपत्ती त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या नावे केली होती.