अहमदाबाद : पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आसाराम बापूच्या एका शिष्यानं एक मोठा खुलासा केलाय. आसारामविरुद्ध साक्षीदारांवर झालेले हल्ले हे पूर्वनियोजित होते... आणि या हल्ल्यांचा कट तुरुंगातूनच आसारामनं रचला होता, असं या शिष्यानं कबूल केलंय.
२००८ साली आपल्या आश्रमात राहणाऱ्या दोन मुलांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आसारामविरुद्ध साक्ष देणाऱ्या व्यक्तीला ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. ही सगळी आसाराम बापू करणीच होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसारामचा अनुयायी के डी पटेल याला एका स्थानिक कोर्टात समर्पणानंतर अटक करण्यात आलीय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं हे खुलासे केलेत.
पटेलनं कथितरित्या साक्षीदार राजू चांडक याच्यावर झालेल्या हल्ल्यांसाठी पैशांचा बंदोबस्त केला होता. चांडक यानं दोन मुलांच्या मृत्यूनंतर आसारामचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं.