www.24taas.com , झी मीडिया, जोधपूर
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले आसाराम बापू यांना जोधपूर कोर्टाने सोमवारी १४ दिवसांची ज्युडिशीअल कोठडी सुनावली आहे. रविवारी रात्री बापूंना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आसाराम बापू यांना राजस्थान पोलिसांनी ३० ऑगस्ट पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स धाडले होते. मात्र बापूंनी वेगवेगळी कारणे देत टाळाटाळ केली. अखेर पोलिसांनी शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी रात्री बापूंना इंदूर येथे अटक केली. त्यानंतर त्यांना रविवारी सकाळी जोधपूर येथे नेण्यात आले.
रविवारी संध्याकाळी बापूंना कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे बापूंना एक रात्र पोलीस कोठडीत काढावी लागली.
आसाराम बापूंनी पास केली पुरुष सामर्थ्य चाचणी!
दरम्यान, आपल्या आश्रमात अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात अटकेत असलेल्या आसाराम बापूंची जोधपूर पोलिसांनी काल तब्बल चार तास कसून चौकशी केली. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळं आज पुन्हा त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. शिवाय इंदूरहून अटक करण्यात आलेल्या ७२ वर्षीय आसाराम बापूंनी एस. एन. मेडिकल कॉलेजमध्ये पुरुष सामर्थ्य परिक्षण चाचणी पास केलीय.
जोधपूरचे पोलीस उपायुक्त अजय पाल लांबा यांनी सांगितलं की, जोधपूरहून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या मानई आश्रमातही आसाराम बापूंना नेण्यात आलं. तिथं घटनेच्या दिवशीचा घटनाक्रम पुन्हा तयार करण्यात आला. त्यानंतर जिल्हा सत्र ग्रामिणचे न्यायाधिश मनोज व्यास यांच्यासमोर त्यांना सादर करण्यात आलं. एक दिवसाची पोलीस कोठडी आसाराम यांना सुनावण्यात आली. पोलिसांनी दोन दिवसीय पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरएसी बटालियन परिसरात पोलिसांच्या कोठडीत आसाराम बापूंना ठेवण्यात आलं.
जोधपूरचे पोलीस आयुक्त बीजू जार्ज जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूंच्या विरोधात आणखी काही मुद्द्यांबाबत तपास सुरू आहे. शिवाय आसाराम बापूंची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली. कारण त्यांनी ३० ऑगस्टला पोलिसांसमोर हजर न राहण्याचं कारण तब्येत बरी नसल्याचं दिलं होतं.
आसाराम बापूंच्या त्यांच्यावरील आरोप अमान्य केले आहेत. शिवाय ते जेवण करतायेत, पाणीही पित आहेत, असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं. कारण देशात आसाराम बापू उपोषण करतायेत अशी माहिती पसरलीय, याबाबतचं स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिलं.