नवी दिल्ली : रविवारी रात्री दिल्लीच्या तुर्कमान गेटवर एक भयंकर घटना घडलीय. एका बाईकस्वारानं आपल्या गाडीला टक्कर दिल्यानं गाडीतील टोळक्यानं बाईकस्वाराला मारहाण करत त्याच्या कुटुंबासमोर त्याची हत्या केलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाज नावाचा एक व्यक्ती आपल्या पत्नी आणि मुलांसोबत बाईकवरून तुर्कमान रोडवरून प्रवास करत होता. यावेळी, त्याच्या बाईकची टक्कर एका गाडीला झाली.
या गाडीतून बिल्डर माफिया आमीन पहलवान आणि त्याचे काही गुंड प्रवास करत होते. बाईकच्या ठोकरमुळे भडकलेल्या आमीन आणि त्याच्या भावांनी लाठ्या-काठ्यानं शाहनवाजवर हल्ला केला. इतकंच नाही तर त्याच्या डोक्यावर लोखंडांच्या सळीनंही हल्ला करण्यात आला. यामुळे, शाहनवाजनं जागेवरच प्राण सोडले. धक्कादायक म्हणजे, शाहनवाजची पत्नी आणि मुलं यांच्यासमोर ही हत्या करण्यात आली.
यानंतर, मृताच्या नातेवाईकांनी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी दिल्ली पोलिसांविरुद्ध प्रदर्शन केलं तसंच काही वाहनांची तोडफोडही केली.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे चौकशी सुरू केलीय. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केलीय मात्र मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.