www.24taas.com, झी मीडिया, बुद्धगया
बिहारमधलं बुद्धगया मंदीर आज साखळी स्फोटाने हादरलं. या मंदिरात झालेल्या 9 स्फोटानं सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. या स्फोटाची पूर्वसुचना आयबीनं दिली होती अशी माहिती आता समोर आलीय. हा इशारा देऊनही स्फोट का रोखता आले नाहीत हा प्रश्न कायम आहे.
जगभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं बुद्धगयाचं मंदिर आज पहाटे साखळी स्फोटानं हादरलं. पहाटे साडेपाचच्या आसपास या मंदीराच्या परिसरात झालेल्या नऊ स्फोटानं सुरक्षा व्यवस्थेच्या मर्यादा पुन्हा एकदा उघड झाल्या. या स्फोटाचा इशारा गुप्तचर संघटनांनी यापूर्वीच दिला होता. बिहारमध्ये विदेशी दहशतवादी लपल्याची माहिती आयबीनं दोन आठवड्यापुर्वीच बिहार सरकार आणि बिहार पोलिसांना दिली होती. तसंच बुद्धगया मंदिर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा इशारा दिल्ली पोलीसांनीही यापुर्वी दिला होता. सुरक्षा यंत्रणेने दिलेले हे सर्व इशारे व्यर्थ ठरले. या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया सरकारी पठडीतलीच होती. सरकारी यंत्रणेच्या या निष्क्रीयेतेवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
या देशात आपण कुठल्याही ठिकाणी हल्ला करु शकतो हे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. स्फोटाचा इशारा दिला होता, या हल्ल्यातल्या दोषींची गय केली जाणार नाही आणि हा हल्ला म्हणजे सरकारी अपयश या सर्व पठडीतल्या उत्तरांची आज पुन्हा उजळणी झाली. पण या सर्व महाभारतानंतरही हे हल्ले रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा कधी निर्माण होणार याचं उत्तर कुणाकडेच नाहीय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.