नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर एक अख्खं कुटुंब संपलंय. कॉर्पोरेट मंत्रालयाचे माजी डीजी बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्या केलीय. याआधी जवळपास दोन महिन्यांपूर्वी बन्सल यांच्या पत्नी आणि मुलीनंही आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होतं.
दिल्लीच्या नीळकंठ अपार्टमेंटमध्ये कॉर्पोरेट अफेअर मंत्रालयात डीजी पदावर कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी बी के बन्सल यांच्यावर लाचखोरीचा आरोप होता. १९ जुलै रोजी सीबीआयनं त्यांना आणखी दोन जणांसहीत लाचखोरी प्रकरणात रंगेहाथ अटक केली होती. ९ लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली होती.
सीबीआयनं बन्सल यांच्या दिल्लीस्थित सहा तर मुंबई स्थित दोन ठिकाणांवर छापे मारले होते. यात आक्षेपार्ह गोष्टींसह जवळपास ५४ लाख रुपयेही जप्त करण्यात आले होते.
बन्सल यांच्या अटकेनंतर दोन महिन्यापूर्वी १९ जुलै रोजी बन्सल यांची पत्नी सत्यबाला (५८ वर्ष) आणि मुलगी नेहा (२८ वर्ष) यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं.
पत्नी आणि मुलीच्या आत्महत्येनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी न्यायाधीशांनी बन्सल यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते.
पत्नी आणि मुलीच्या आत्महत्येच्या दोन महिन्यानंतर आज बी के बन्सल यांनी आपल्या मुलासहीत आत्महत्येचं पाऊल उचललं.