नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट करणा-या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून आजपासून या ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट मिळणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून लकी ग्राहक योजना आणि लकी व्यापारी योजना सुरु केलीये.
या योजनेनुसार डिजिटल पेमेंट करणारे ग्राहक आणि व्यापारी यांना कोट्यावधींची बक्षिसं देण्यात येणार आहेत. या योजनेस पात्र होण्यासाठी नागरिकांना 50 रुपयांपासून 3 हजारांपर्यंत डिजिटल खरेदीचे व्यवहार करावे लागणार आहेत.
आजपासून 100 दिवस ही योजना सुरु रहाणार आहे. या योजनेवर सरकार 340 कोटी रुपये खर्च करणार आहे. या योजनेनुसार डिजिटल पेमेंट केल्यास दरदिवशी 15 हजार ग्राहकांना 1 हजार रुपयांचं बक्षिस दिलं जाणार आहे. शिवाय योजनेनुसार आठवड्याचा मानकरीही घोषित केला जाणार आहे. त्यात 7 विजेत्यांना 1 लाखांपर्यंतची बक्षिसं मिळणार आहेत.
व्यापा-यांनाही एका आठवड्यात सात हजार पुरस्कार दिले जाणार आहेत. या योजनेशिवाय 8 नोव्हेंबर ते 13 एप्रिल दरम्यान डिजिटल व्यवहार करणा-या ग्राहकांना 14 एप्रिल रोजी पुरस्कार दिले जाणार आहेत.
त्यासाठी जास्तीत जास्त 1 किटींपर्यंतची बक्षिसं दिली जाणार आहेत. शिवाय 50 लाख आणि 25 लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार आहे. व्यापा-यांसाठी बक्षिसांची ही रक्कम 50 लाख, 25 लाख आणि 5 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आलीये.