गँगरेप प्रकरण : आंदोलकांवर लाठीचार्ज, `तिला` न्याय मिळणार?

देशभरात उद्रेक पसरला आहे. कोणताही नेता नाही किंवा सामाजिक कार्यकर्ताही नाही. तरी सारे एकवटले आहेत... `तिला` न्याय देण्यासाठी.

Updated: Dec 22, 2012, 12:36 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
देशभरात उद्रेक पसरला आहे. कोणताही नेता नाही किंवा सामाजिक कार्यकर्ताही नाही. तरी सारे एकवटले आहेत... `तिला` न्याय देण्यासाठी... साऱ्या देशाची एकच आर्त साद, ती बरी व्हावी आणि नराधमांना शिक्षा व्हावी. दिल्लीच्या याच सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ती आयसीयूमध्ये उपचार घेते आहे.... शरीर सुन्न... डोळ्यात साठलेलं पाणी आज तिच्या भावना व्यक्त करतात... त्या नराधमांना शिक्षा व्हावी हीच `तिची` इच्छा... या तरुणीसाठी सारा देश एकवटला आहे.
तिच्या वेदना आज सा-या देशाला जाणवतात.. त्यामुळंच देशभरातून तिच्यासाठी प्रार्थना करण्यात येते आहे. उत्तरेपासून दक्षिणपर्यंत. यावेळी देशाच्या कोणत्याही राज्यात नाही वाद... सीमावादांचे बंध झुगारत एका घटनेमुळं देशभरात पसरलाय संताप आणि आक्रोश... देशभरातल्या उद्रेकानंतर सरकारचंही धाबं दणाणलंय.. दिल्लीतल्या गँगरेप प्रकरणासारख्या घटना टाळण्यासाठी अनेक ठोस पाऊलं उचलण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केलीय.. तरुणीचे जाळलेले कपडे आणि इतर महत्वाच्या गोष्टी पुरावे म्हणून पोलिसांच्या हाती लागलेत..या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी हीच सा-या देशाची इच्छा.. शिवाय देशवासियांचा हा संताप, आक्रोश वाया जाऊ नये...यापुढं अशा कृत्यांमुळं कोणत्याही तरुणीनं देशातल्या हॉस्पिटलमध्ये जीवनमरणासाठी झुंज देऊ नये.