www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
रेल्वेनं सुरक्षेचं कारण पुढे करत सर्व रेल्वेगाड्यांच्या थ्री टायर (थर्ड एसी) डब्ब्यांमधून पडदे काढण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, या डब्ब्यांमधील खिडक्यांचे पडदे मात्र कायम राहतील.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आलाय. आयुक्तांनी गेल्या वर्षी बंगळुरू-नांदेड एक्सप्रेसमध्ये झालेल्या अग्निकांडाच्या चौकशीनंतर ही शिफारस करण्यात आलीय. या दुर्घटनेत २६ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डानं १२ मार्च रोजी थर्ड एसी कोचमध्ये लावण्यात आलेले पडदे हटविण्याचा निर्णय घेतलाय. रेल्वेच्या सर्व झोन्सला या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या डब्ब्यांची जिथेही साफसफाई होईल तिथे हे पडदे हटविण्यात येतील.
हे पडदे अग्निरोधक सामग्रीपासून बनविण्यात आलेत. परंतु, तरिही सुरक्षा आयुक्तांनी केलेल्या शिफारशींनुसार त्यांना हटविण्यात येणार आहे. रेल्वे सुरक्षा प्रणालीला मजबूत बनविण्याच्या दिशेनं विचार-विनिमय करण्यासाठी २४-२५ एप्रिल रोजी सुरक्षा प्रौद्योगिक तज्ज्ञांचं एक आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.
रेल्वेनं प्रवाशांना एकांत मिळावा यासाठी २००९ साली एसी डब्ब्यांमध्ये पडदे लावण्याचा निर्णय घेतला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.