मुंबई : तुम्ही काबाड कष्ट करून कमवलेली कित्तेक वर्षांची कमाई धोक्यात आहे. कारण बँकेत असलेल्या तुमच्या कमाईवर हॅकर्सची नजर पडली आहे. तब्बल दहा बँकांचा डेटा चोरी झालेली असून काही बँकांमधून पैसेही गायब झाल्याचं वृत्त आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ ए पी होता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एनपीसीआय या बँकांच्या संपर्कात असून या बँकांच्या खात्यांचं फॉरेंसिक ऑडिट करण्यात येत आहे. यासंदर्भात चौकशी सुरू असून उद्यापर्यंत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एनपीसीआयमध्येच डेटा हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हॅकर्स मोबाईलवरून व्हिडिओ क्लीप पाठवत असून यात मलेशिया एअरलाइंसचं विमान समुद्रात पडल्याची दृश्य आहेत. मात्र ही व्हिड़िओ क्लिप नसून हा व्हायरस आहे. त्यामुळे हा व्हिडिओ उघडणंच धोक्याचं असून आपल्या फोनला जोडलेलं बँक खातंच हॅक होण्याची भीती आहे.
असा व्हिडिओ आल्यास तो तातडीनं डिलीट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या व्हिडिओच्या मास्किंग इमेजमध्ये MONTENEGRÓ लिहिण्यात आलं असून याशिवाय .me डोमेन्सपासूनही दूर राहण्याच्या सूचना आहेत.