पाक टेरर बोट: कोस्ट कार्ड DIGच्या दाव्यानं केंद्र सरकार गोत्यात

भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी नुकताच खुलासा केला. त्यामुळं नवा वाद उफाळून आलाय. ३१ डिसेंबर २०१४च्या मध्यरात्री पाकिस्तानी बोट, गुजरातमधल्या पोरबंदर सागरी किनाऱ्यापासून काही अंतरापर्यंत आत शिरली होती. ती बोट उडवण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती, नुकतीच तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी दिली. 

Updated: Feb 18, 2015, 12:02 PM IST
पाक टेरर बोट: कोस्ट कार्ड DIGच्या दाव्यानं केंद्र सरकार गोत्यात title=

नवी दिल्ली: भारतीय सागरी हद्दीत शिरलेल्या पाकिस्तानी बोटीसंबंधी तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी नुकताच खुलासा केला. त्यामुळं नवा वाद उफाळून आलाय. ३१ डिसेंबर २०१४च्या मध्यरात्री पाकिस्तानी बोट, गुजरातमधल्या पोरबंदर सागरी किनाऱ्यापासून काही अंतरापर्यंत आत शिरली होती. ती बोट उडवण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती, नुकतीच तटरक्षक दलाच्या उपमहानिरीक्षकांनी दिली. 

गेल्या वर्षी ३१ डिसेंबररोजी देशभरात नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरु असतानाच गुजरातमधील पोरबंदरजवळील समुद्रात पाकिस्तानमधून आलेली संशयास्पद बोट आढळली होती. तटरक्षक दलाच्या जवानांनी बोटीचा पाठलाग केला असता बोटीवरील चौघा संशयीतांनी बाँबस्फोट घडवून बोटीला उडवले. भारतात पुन्हा २६/११ सारखा हल्ला घडवण्याचा प्रयत्न उधळला असा दावाही तटरक्षक दलानं केला होता. मात्र या कारवाईविषयी सुरुवातीपासूनच शंका उपस्थित होत होत्या. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीदेखील बोटीत दहशतवादी होते असा दावा करत बोटीवरील संशयितांनीच बोट उडवली असं स्पष्ट केलं होतं. 

मात्र आता तटरक्षक दलाच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यानं या दाव्याशी विसंगत विधान केल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्रात म्हटलं आहे. 'तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेल, त्या दिवशी पाकमधून एक बोट आली होती, त्या बोटीला उडवण्याचे आदेश मीच दिले होते, आम्हाला त्या लोकांना बिर्यानी द्यायची नव्हती' असं विधान तटरक्षक दलाचे डीआयजी बी. के. लोशली यांनी केले. लोशली  गुजरातमधील तटरक्षक दलाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. लोशाली यांचा हा दावा आता मोदी सरकारची डोकेदुखी वाढवेल असं दिसतं.

गंभीर बाब म्हणजे याआधी भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी, पाकिस्तानची ती बोट त्यातल्या दहशतवाद्यांनीच स्वतः स्फोटात उडवल्याचं म्हटलं होतं. या परस्परविरोधी विधानांमुळं नवा वाद निर्माण झालाय. या प्रकरणी उपमहानिरीक्षकांच्या त्या वादग्रस्त विधानावर थोड्याच वेळात तटरक्षक दल खुलासा करणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.