नवी दिल्ली : टीव्ही वाहिन्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तयार केलेल्या मार्गदर्शन नियमावलीत म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसात झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण काही दूरदर्शन वृत्त टीव्ही वाहिन्यांवर दाखविण्यात आले. या घटनेची गंभीर दखल घेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक नियमावली तयार केली आहे.
या मार्गदर्शक नियमावलीमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत असलेले ठिकाण, क्षमता, कारवाईचा प्रकार, धोरण तसेच लष्करी कारवायाबाबतची अन्य माहितीवर टीव्ही वाहिन्यांनी लक्ष केंद्रीत न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दहशतवाद्यांसह त्यांना हाताळणाऱ्यांना मदत न करता टीव्ही वाहिन्यांनी निष्पाप जिवांचे प्राण जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असेही म्हटले आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेचा भाग म्हणून दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण करण्यात येऊ नये असेही पुढे म्हटले आहे.
"संवेदनशीलता लक्षात घेऊन प्रसारमाध्यमांनी सहकार्य मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत", असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव बिमल जुल्का यांनी सांगितलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.