हैदराबाद : इस्लाम हे प्रत्येक धर्माचे मूळ असून जेव्हा सर्व धर्मातील लोकं इस्लाम धर्म स्वीकारतील तिच खरी 'घर वापसी' ठरेल असे विधान एमआयएमचे असदपद्दीन ओवैसी यांनी केले आहे. प्रत्येक मुलगा जन्माला येतो तेव्हा तो मुस्लिमच असतो पण मुलाचे आईवडिल त्याचा धर्म बदलतात असे वादग्रस्त विधानही ओवैसी यांनी केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सध्या 'घर वापसी' ही मोहीम राबवली जात असून यावर ओवैसी यांनी हैदराबादमधील एका कार्यक्रमात भाष्य केले आहे. ओवैसी म्हणतात, मुस्लिमांना ५ लाख तर ख्रिश्चनांना २ लाख रुपयांचे आमीष दाखवत धर्मांतर केले जात आहे. मुस्लिमांना फक्त ५ लाख रुपये देणे हास्यास्पद असून जगातील सगळी संपत्ती मुसलमांना दिली तरी मुस्लिम धर्मांतर करणार नाही.
देशभरात राहणाऱ्या अन्य धर्मातील लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारावा असे आवाहन करत तुम्हाला आम्ही पैसे देऊ शकत नाही पण इस्लाम धर्म स्वीकारल्यावर तुम्हाला हमखास यश मिळेल असे त्यांनी सांगितले. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी कोणावरही सक्ती करणार नाही अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली. हाफीज सईद आणि झकीउर रहमान लख्वी या दोघांवरही पाकने कठोर कारवाई करावी, ते दोघेही भारताचे आणि इस्लामचेही शत्रू आहेत. भाजपासोबत आमचे राजनैतिक मतभेद असले तरी भारताच्या शत्रूंविरोधात केल्या जाणा-या प्रत्येक कारवाईसाठी आम्ही केंद्र सरकारला पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.