नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. यामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला चाप लागेल. सगळ्यात मोठा दणका हा पाकिस्तानात छापल्या जाणाऱ्या बनावट नोटांना लागणार आहे. यामुळे पाकिस्तानातील दहशदवाद्यांना होणारी फंडींग बंद होणार आहे. केंद्रीय गृहराज्य मंत्री किरन रिजिजू यांनी म्हटलं की, यामुळे पाकिस्तानातील 'प्रिंटिग प्रेस' बंद होईल जेथे खोट्या नोटा छापल्या जातात.
पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा बनवल्या जातात. या बनावट नोटांच्या माध्यमातून दहशतवाद्यांना फंड पुरवला जातो. भारताविरोधातच कारवाया करण्यासाठी या पैशाचा वापर होतो. रिजिजू यांनी म्हटलं की, १,००० आणि ५०० च्या जुन्या नोटा बंद झाल्याने आता कराची आणि पेशावरमधल्या प्रिंटिंग प्रेस बंद होणार आहेत. बनावट नोटा या सुरक्षा यंत्रणांसाठी डोकेदुखी बनल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावरच कुऱ्हाड चालवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.