एकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?

काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय. 

Updated: Nov 10, 2016, 02:06 PM IST
एकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?

मुंबई : काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय. एकाच कुटुंबानं दीड लाख रुपयांच्या रेल्वेचं तिकीट बुकींग केलंय. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत हे तिकीट बुक करण्यात आल्याचं पुढं आलं आहे.

हे कुटुंब कोण आहे, त्यांना खरच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जायचं आहे का याबाबतचा तपशील अजून पुढे आलेला नाही. दरम्यान रेल्वे रिझर्वेशनच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेनं दणका दिला आहे. पश्चिम रेल्वेवर 13 तारखेनंतरचं एसी फर्स्ट क्लासचं कॅश काऊंटरवरचं रिझर्वेशन बंद करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. अशा संशयित प्रवाशांची माहिती रेल्वेकडून घेतली जात आहे. लाखो रुपयांची बूकिंग करणाऱ्यांनी ती तिकीटं रद्द केली तर रेल्वे बोर्डाची परवानगी घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. गरज पडल्यास ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटलाही देण्यात येणार आहे. 

एवढच नाही तर 50 हजारांपेक्षा जास्तचं तिकीट खरेदी करायचं असेल किंवा रिझर्वेशन कॅन्सल करायचं असेल तर पॅन कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. कालच्या एकाच दिवसामध्ये पश्चिम रेल्वेवर एक कोटी 80 लाख रुपयांची खरेदी झाली. 8 तारखेला म्हणजेच जेव्हा नोटांबाबतचा हा निर्णय जाहीर झाला नव्हता तेव्हा सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत 80 लाख रुपये रिझर्वेशनच्या माध्यमातून जमा झाले होते.