लखनऊ : उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं खुशखबर दिली आहे. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचं एक लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. योगी सरकारच्या या निर्णयाचा फायदा तब्बल २ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर ३६ हजार कोटींचा भार येणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ९२ टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवेळी भाजपनं शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची भाजपनं पूर्तता केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या निर्णयाचे पडसाद आता महाराष्ट्रातही पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते मग महाराष्ट्रात का नाही असा सवाल शिवसेनेनं याआधीच विचारला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनंही शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली आहे.