मुंबई : हजार-पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांची जोरदार खडाजंगी झाली. नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली.
पूर्वतयारी न करताच केंद्रानं हा निर्णय घेतल्यानं सामान्यांना त्रास होत असल्याचं सांगत घटक पक्षांना विश्वासात न घेताच निर्णय घेतल्यानं शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तर सरकारनं सरकारमध्ये राहून विरोधाची भूमिका घेणे चुकीचे असल्याचा भाजपा मंत्र्यांनी शिवसेना मंत्र्यांना सल्ला दिला आहे. या विषयावर आमच्या पक्षाची विरोधाची भूमिका असल्याचे शिवसेना मंत्र्यांनी बैठकीत सांगितले आहे. जिल्हा बॅंकांवर घातलेल्या निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थ मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राज्यातील शेतक-यांची जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत खाती मोठ्या संख्येने आहेत. शेतक-यांचे दैनंदिन व्यवहार जिल्हा बॅकांमार्फत होत असता शेतक-याची अडचण मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या कानावर घातली.