'गेल'च्या गॅस पाईपलाईनला भीषण आग; 14 जण ठार

Updated: Jun 27, 2014, 10:20 AM IST
'गेल'च्या गॅस पाईपलाईनला भीषण आग; 14 जण ठार title=

 

हैदराबाद : आंध्रपदेशच्या पूर्वी गोदावरी जिल्ह्यातील केजी बेसिननजीक ‘गेल’ (गॅस अथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) च्या पाईपलाईमध्ये स्फोट झाल्यानं परिसराला भीषण आगीनं वेढलं. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. 

या आगीत 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती लागतेय. तर या दुर्घटनेत जवळपास 20 जण जखमी झाल्याचं समजतंय. तर परिसरातील 50 हून अधिक घरं या आगीत भस्मसात झालीत.

‘गेल’च्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्याची आणि दुर्घटनेत होणारी हानी थांबविण्याला प्रथम प्राधान्य दिलं जातंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गेलच्या अध्यक्षांसोबत फोनवर संपर्क साधला. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिलेत. 

'झी मीडिया' ब्युरोच्या रिपोर्टनुसार, आग ममीदीपुरम मंडळच्या नगरम गावात असलेल्या पाईपलाईनमध्ये ही आग लागली होती. गॅसची पाईपलाईन असल्यानं ही आगीनं खूपच वेगानं जोर पकडला... आणि बघता बघता आगीनं आणि धुरानं सारा आसमंत भरून गेला.

परिसरात एकच गोंधळ उडाला. काही भागांतील नागरिकांना घटनास्थळावरून हलवण्यातही आलं आणि परिसर रिकामा केला गेला. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. पाईपलाईनमध्ये असलेल्या गॅस संपूर्ण जळून गेल्यानंतर ही आग आटोक्यात आणणं शक्य झालं.

जखमींना काकीनाडा आणि अमलापूरम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. गेलच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब घटनास्थळावर दाखल होऊन परिस्थितीचा आढाव घेतला. काही काळासाठी सप्लाय लाईन बंद करण्यात आलीय 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.