www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.
द्वारका कोर्टात सुरु असलेल्या एका खटल्यात एका महिलेनं आपल्या पतीवरच बलात्काराचा आरोप केला होता. अॅडिशनल सेशन जज वीरेंद्र भट्ट यांनी यावर निर्णय देताना, पती आणि पत्नी यांच्या संबंधांत पीडितेच्या संमतीनं सेक्स झाला असेल किंवा नाही पण, अशावेळी हे बलात्काराचं प्रकरण होऊ शकत नाही असं स्पष्ट केलंय.
काय आहे प्रकरण?
खटल्यातील पत्नीच्या दाव्यानुसार, आरोपी विकास यानं मार्च 2014 मध्ये तिला भूल देऊन गाझियाबादच्या मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला आणि लग्नाच्या दस्तावेजांवर तिचे हस्ताक्षर घेतलं. त्यानंतर आरोपीनं पीडित महिलेसोबत बलात्कार केला आणि नंतर तिला सोडून दिलं. महिलेनं ऑक्टोबर 2013 मध्ये पोलिसांकडे याबद्दल तक्रार नोंदविली. न्यायालयानं या प्रकरणात 7 मे रोजी आपला निर्णय देताना, तक्रारकर्ता आणि आरोपी हे दोघे कायदेशीररित्या एकमेकांसोबत वैवाहिक जीवनात आहेत. सोबतच, पीडित महिला सज्ञानदेखील आहे. अशा परिस्थितीत दोघांचं लग्न झालं असताना जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असले तरीदेखील हे बलात्काराचं प्रकरण असू शकत नाही, असं म्हटलंय.
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, या गोष्टीचा कोणताही पुरावा महिलेकडे नाही, ज्यामुळे लग्नाची नोंदणी करण्यापूर्वी तिला भूल किंवा नशा दिली गेली असावी.
दुसरीकडे, आरोपी विकासच्या म्हणण्यानुसार, आपण महिलेच्या घरीच 2 फेब्रुवारी 2011 रोजी लग्न केलं होतं. तसंच पत्नीच्या म्हणण्यानुसारच, त्यांनी गाझियाबाद कोर्टात लग्न रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला होता. विकासनं केलेल्या आरोपानुसार, त्याच्या बहिणीच्या घराचा मालकी हक्क त्याला मिळाला नाही म्हणूनच चिडून पत्नीनं त्याच्यावर बलात्काराचा आरोप केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.