बिजनौर ( उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये एक वेगळी घटना उघडकीस आली आहे. इथे चक्क एका प्रेयसीने तिच्या प्रियकरावर अॅसिड हल्ला केला आहे. आफरीन असं गुन्हा करणाऱ्या मुलीचं नाव आहे.
आफरीनने तिचा बॉयफ्रेंड असलेल्या सूरज कुमारला वाढदिवसानिमित्त तिच्या घरी बोलावलं आणि त्याच्यावर अॅसिड फेकलं. आपण लग्नाला नकार दिल्याने तिने असं केल्याचं सूरजचं म्हणणं आहे.
सूरज आणि आफरीन यांच्या वेगळ्या धर्मांमुळे लग्न करणे शक्य नसल्याचे सूरजला वाटत होते. आपल्या घरच्यांना लग्नासाठी तयार करणे सूरजला न जमल्याने त्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव आफरीनने तिच्या बर्थडे पार्टी नंतर सूरजला पुन्हा आपल्या घरी बोलावले आणि त्याच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले.
अशा घटनेने पोलिसही धास्तावले आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सूरज २०% भाजला असून सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे आणि तो धोकादायक अवस्थेच्या बाहेर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.