www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कोळसा माफियांविरोधात चळवळ उभी करणाऱ्या रमेश अग्रवाल यांना प्रतिष्ठेचा ग्रीन नोबल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय.
अवैध खाणकाम आणि कोळसा माफियांविरोधात चळवळ उभी करणा-या रमेश अग्रवाल यांचं वय आहे ६० वर्षे. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी हा लढा उभा केला. याच कामासाठी आपणाला ग्रीन नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. मात्र हे प्रत्यक्षात घडलंय.
अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोत पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शिवाय 1 कोटी 5 लाख रूपयांच्या बक्षिसासह गोल्डमन पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
रमेश अग्रवाल यांचं कार्य अनेकांना प्रेरणादायी आहे. छत्तीसगडच्या रायगढ परिसरात गेल्या दोन दशकांपासून पर्यावरण रक्षणाचं आणि पर्यावरणविरोधी ओद्योगिकीकरणाला विरोध करण्याचं काम ते करतायत. अग्रवाल आणि त्यांच्या साथीदारांच्या आंदोलनाचा परिपाक म्हणूनच, तीन मोठ्या उद्योजक घराण्यांना रायगढमध्ये उद्योग सुरु करण्यास वा वाढवण्यास परवानगी मिळू शकलेली नाही.
रायगढ परिसरातल्या अवैध कोळसा खाणकामाच्या विरोधातील गावक-यांच्या आंदोलनाला त्यांनी बळ दिलं. या लढ्यात नवीन जिंदाल यांच्या जेएसपीएल या कंपनीचा प्रस्तावित कोळसा प्रकल्पही त्यांनी उभा राहू दिला नाही. कोळसा माफियांच्या डोळ्यात खुपणा-या रमेश यांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्लेही झाले. यातल्या एका हल्ल्यात तर त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली.
एका छोट्याशा सायबर कॅफेत पर्यावरण वाचवण्याची मोहीम रमेश अग्रवाल यांनी सुरु केली. आत्तापर्यंत एका मोठ्या कोळसा खाण कंपनीसह तीन मोठ्या केसेस त्यांनी कोर्टात जिंकल्यात. आणखी सात प्रकरणात त्यांचा लढा कोर्टात सुरु आहे. ९० च्या दशकात साक्षरतेतून जनजागृतीचा प्रयत्न करणा-या रमेश यांनी २००५ साली जन चेतना मंच या संस्थेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली.
छत्तीसगडमध्ये अवैध उत्खनन रोखण्यासाठी मुख्यमंत्री रमणसिंह सरकारच्या भूमिकेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. इतकंच काय, पण रमेश अग्रवाल यांच्यासारख्या लढाऊ कार्यकर्त्यांना हे सरकार नीट सुरक्षाही पुरवू शकलेलं नाही. सगळी व्यवस्थाच विरोधात असतानाही, ते अजून हिंमत हरलेले नाहीत... बंदुकीच्या गोळ्या खाऊनही त्यांचा लढा सुरूच आहे.
महाराष्ट्रात रत्नागिरीसारख्या ठिकाणी जिंदाल प्रकल्पामुळं पर्यावरणावर परिणाम झाल्यानं आंब्याच्या बागा, पिण्याचे पाणी, मासेमारीवर संक्रांत ओढवलीय, हे आम्ही सातत्यानं दाखवतोय. तिथले स्थानिक नागरिक आणि मच्छिमार सातत्यानं लढा देत असले तरी त्यांचा आवाज कुणीच ऐकत नाहीय. निसर्गाचा असा -हास सुरू असताना रमेश अग्रवाल यांचं काम किती मोलाचं आहे, याची ठळकपणे जाणीव होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.