नोटाबंदीच्या 'अवघड' काळात दिलासादायक बातमी

नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय. 

Updated: Dec 15, 2016, 01:54 PM IST
नोटाबंदीच्या 'अवघड' काळात दिलासादायक बातमी title=

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मागणीमध्ये घट झाल्यानं त्याचा परिणाम महागाईच्या आकड्यांवरही दिसून येतोय. 

महागाईच्या दरात घट झालीय. ठोक मूल्यावर आधारित महागाई दरात सलग तिसऱ्या महिन्यात घट झालेली पाहायला मिळालीय. 

नोव्हेंबरमध्ये ठोक मूल्यांवर आधारित महागाई दर ३.१५ टक्के राहिला. तर ऑक्टोबरमध्ये हाच दर ३.३९ टक्क्यांवर पोहचला होता. 

रिटेलच्या महागाई दराच्या आकड्यांतही घट झाल्याची नोंद झालीय. रिटेल महागाई दर गेल्या दीड वर्षांच्या खालच्या स्तरावर पोहचलाय. नोव्हेंबरमध्ये रिटेल महागाई दर ३.६३ टक्के होता तर हाच दर ऑक्टोबरमध्ये ४.२० टक्क्यांवर पोहचला. 

नोटाबंदीच्या काळात प्रत्येकासमोर रोख रक्कमेची समस्या आहे. या दरम्यान कोणकोणत्या वस्तूंच्या किंमती कमी झाल्यात... टाकुयात एक नजर...

- एका महिन्यापूर्वी १३५ रुपये प्रति किलो विकली जाणारी तूर, मूग डाळ सद्या ९०-९५ रुपयांवर येऊन पोहचलीय. जवळपास ३० टक्के घट डाळींच्या किंमतीत पाहायला मिळतेय. 

- चना डाळही ३०-४० रुपयांनी घसरून ८० रुपये प्रति किलोवर पोहचलीय. 

- १८० रुपये किलोनं विकली गेलेली उडदाची डाळ सध्या १२० रुपये प्रति किलोवर आलीय. 

- एक किलो साखर ४२ रुपयांवरून घसरून ३८ रुपये किलोवर येऊन पोहचलीय. 

- गहू आणि गव्हाच्या पीठाच्या किंमतींत मात्र वाढ झालेली पाहायला मिळतेय. २० रुपये प्रती किलो मिळणाऱ्या सुट्या गव्हाच्या पीठासाठी सध्या २५ रुपये मोजले जात आहेत.