अहमदाबाद : सध्या अवयवदान आणि प्रत्यारोपण आणि त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याच्या चांगल्या बातम्या अधून मधून येत असतात. मात्र याला गालबोल लावणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. चार्टर्ड विमानाचं भाडं परवडत नसल्यामुळे हृदय वेळेत मुंबईत येऊ शकलेलं नाही.
भूजमध्ये एका महिलेला ब्रेन-डेड घोषित करण्यात आले. तिच्या नातलगांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. त्याच वेळी मुंबईमध्ये एका रुग्णाला हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. त्यासाठी तातडीने हृदय मुंबईत आणणं आवश्यक होते. चार्टर्ड विमानाचं भाडं १४ लाख रुपये सांगण्यात आले.
रुग्णाच्या नातलगांना ही रक्कम परवडणारी नव्हती. त्यामुळे हे हृदय वेळेत पोहोचूच शकले नाही. नव्या हृदयाच्या प्रतिक्षेत रुग्ण तसाच राहिला आणि नव्या देहाच्या वाट बघून ते हृदयही अखेर बंद पडले. कोणताही अवयव एकदा शरीरातून काढल्यावर निश्चित कालावधीत त्याचं प्रत्यारोपण होणं आवश्यक असते. अशा वेळी अवयवांची जलद वाहतूक हा कळीचा मुद्दा असतो.