अहमदाबाद : गुजरातमधल्या गुलबर्गा सोसायटीमधील जळीतकांड प्रकरणी विशेष न्यायालयानं २४ आरोपींना दोषी ठरवलंय तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
सर्वात महत्त्वाचे २००२ च्या गुजरात दंगलीदरम्यान गुलबर्गा सोसायटीवर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित नव्हता असं कोर्टानं आपल्या निकालपत्रात नमूद केलंय. दोषी ठरवण्यात आलेल्या २४ आरोपींमधील ११ जणांवर हत्येचा आरोप सिद्ध झालाय. तर इतर १३ जणांना इतर आरोपांबाबत दोषी ठरवण्यात आलंय.
दोषींना सहा जूनला शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष कोर्टानं दिलेल्या या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं याचिकाकर्त्या झाकिया जाफरींनी सांगितलंय.
या जळीतकांडात झाकिया जाफरी यांचे पती आणि काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी ठार झाले होते. गेल्या सात वर्षांपासून विशेष कोर्टात वेगवेगळ्या चार न्यायाधिशांसमोर या जळीतकांडावर सुनावणी सुरू होती.