नवी दिल्ली : अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण 1976-77 मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते. असा दावा प्रसिद्ध पुरातत्व जाणकार के.के. मोहम्मद यांनी केला आहे.
हे खोदकाम जेव्हा झालं तेव्हा आपणही त्या टीममध्ये असल्याचं मोहम्मद म्हणाले आहेत. मोहम्मद यांनी आपलं आत्मचरित्र 'जानएन्ना भारतीयन'(मी पण एक भारतीय) मध्ये हा दावा केला आहे. मोहम्मद हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग उत्तर प्रदेशचे निर्देशकही होते.
मोहम्मद यांनी दावा केला आहे, की त्या वादग्रस्त जागेवर खोदकाम करताना आम्हाला 14 स्तंभ मिळाले, हे स्तंभ 11 व्या आणि 12 व्या शतकातील मंदिरांच्या बांधकामासारखे होते. या खोदकामामुळे हे सिद्ध झालं की मंदिराच्या जागी मशिद उभारण्यात आली. या सगळ्या प्रकाराबाबत आपण इंग्रजी वृत्तपत्रांनाही माहिती दिली पण कोणीच त्याला महत्त्व दिलं नसल्याचंही मोहम्मद म्हणालेत.
अयोध्येच्या मुद्द्यावरुन डाव्या संघटना आणि काही इतिहासकारांनी दिशाभूल केली नसती तर हा प्रश्न कधीच सुटला असता असा आरोपही मोहम्मद यांनी केला आहे. इतिहास अनुसंधान परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रोफेसर इरफान हबिब, रोमिला थापर, बिपीन चंद्रा, एस गोपाल यांच्यासारख्या डावे विचार असणाऱ्या इतिहासकारांनी मुस्लिम विचारवंतांचं ब्रेन वॉश केलं आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून अलाहाबाद हायकोर्टाचीही दिशाभूल केल्याचं मोहम्मद म्हणाले आहेत.
19 व्या शतकाआधी मंदिरामध्ये तोडफोड झाल्याचं आणि तिथे बौद्ध किंवा जैन धर्माचं केंद्र असल्याचे कोणतेही दाखले नाहीत, हे मुस्लिमांना सांगण्यात सगळे डावे विचारवंत यशस्वी झाले. असंही मोहम्मद म्हणालेत. डावे इतिहासकार आरएस शर्मा, डीएन झा, सूरज बेन आणि अख्तर अली यांनीही त्याचं समर्थन केलं. या सगळ्यांनी काही मुस्लिम नेत्यांना घेऊन अयोध्येचा मुद्दा शांततापूर्ण मार्गानं सोडवून दिला नाही, असा दावा मोहम्मद यांनी केला आहे.