गोव्यातली सत्ता काँग्रेसनं अशी घालवली

जनतेनं पाहिजे तसा कौल दिलेला नसला तरी सुद्धा राज्य राखण्यात भाजपनं गोवा राखण्यात यश मिळवलं.

Updated: Mar 13, 2017, 06:44 PM IST
गोव्यातली सत्ता काँग्रेसनं अशी घालवली  title=

पणजी : जनतेनं पाहिजे तसा कौल दिलेला नसला तरी सुद्धा राज्य राखण्यात भाजपनं गोवा राखण्यात यश मिळवलं. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळवूनही आता सत्तेपासून दूर राहवं लागणार आहे, पण त्याचं कारणही काँग्रेसच आहे.

११ मार्चला जाहीर झालेल्या निकालात काँग्रेसला १७, भाजपला १३ महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला ३, गोवा फॉरवर्ड पार्टीला ३, अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून ३ आमदार निवडून आले. खरंतर सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेसनं सत्ता स्थापनेचा दावा करायाला हवा होता, पण घडलं निराळचं. पर्रिकर आणि गडकरींनी डाव फिरवला आणि आता पर्रिकर शपथ घेण्यासाठी सज्ज झालेत.

भाजपनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेच्या हलाचाली सुरू केल्या त्यावेळी काँग्रेस स्वस्थ बसून नव्हती. सकाळपासून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या खऱ्या, पण त्या अगदीच काँग्रेसी पद्धतीच्या ठरल्या. काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदासाठीच्या शर्यतीत दिगंबर कामत, लुईझीन फालेरो, रवी नाईक आणि प्रतापसिंह राणे होते. रविवारी सकाळी त्यातली नाईक आणि राणेंची नावं मागे पडली आणि कामत फालेरो शर्यतीत उरले. दिग्विजय सिंहांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक झाली, पण नावावर एकमत झालं नाही. बैठकीत निर्णय नेहमीप्रमाणे हायकमांडवर सोडण्यात आला.

दरम्यानच्या काळात गोवा फॉरवर्ड पक्षानं फालेरोंना पाठिंबा देणार नाही असं स्पष्ट केलं होतं, त्यामुळे खरंतरं कामतांचं नाव निश्चित झालं असंत तर काँग्रेसची निम्मी डोकेदुखी कमी झाली असती. पण हायकमांड कल्चरमध्ये अडकून बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना ते जमलं नाही.

तिकडे गडकरी, पर्रिकर आणि श्रीपाद नाईक निकालाच्या आधीच गोव्यात होते. काहीही झालं, तरी हातचा गोवा जाऊ द्यायचा नाही या इराद्यानंच त्यांनी रणनीती आखली. निकालाच्या रात्रीच गडकरींनी मगोपक्षाच्या सुदीन ढवळीकरांना हाताशी घेण्यासाठी उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. गोवा फॉर्वर्ड पार्टीशी वाटाघाटी केल्या आणि मंत्रीपदाच्या आमिषानं त्यांनाही गळाला लावलं.

उत्तरप्रदेशातल्या दारुण पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस सावरण्याआधीच गडकरींच्या रणनीतीनं पुन्हा एकदा जोरदार हादरा दिला आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काँग्रेस गलित गात्र झाली. भाजपवर सत्ता आणि पैशाच्या दुरुपयोगाचा आरोप सुरू केला.

सुशेगात म्हणजे आरामात जगण्याचा आनंद घेण्याचा गोवेकरांचा  स्वभाव. निकालानंतर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि पक्षपदाधिकारी सुशेगात झाले, पण भाजपनं विशेषतः गडकरींनी सुशेगात गोव्यात वायूवेगानं सूत्र फिरवली आणि भाजपच्या सत्ता राखण्याच्या प्रयत्नात यश आलं.