www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
साऱ्या देशवासियांना अभिमान वाटावा अशी ही बातमी... भारतानं आपल्या सर्वात शक्तीशाली मिसाईल म्हणजेच ‘अग्नी-५’ची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पाडलीय. ओडिसाच्या व्हिलर बेटावर ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण पार पडलंय.
जर ‘अग्नी-५’ची ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे चीनचा दबदबा कमी होण्यात मदत होणार आहे. कारण, ‘अग्नी-५’च्या रुपाने देशाला एक मजबूत सुरक्षाकवच मिळालंय. अण्वस्त्रांसह पाच हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता या मिसाईलची आहे. त्यामुळे चीनही भारताच्या टार्गेटवर येणार आहे. जवळजवळ दीड टनाचे रासायनिक शस्त्रांत्राची वाहतूक या मिसाईलमध्ये करता येऊ शकते. ‘अग्नी-५’ ही तीन टप्प्यांची मिसाईल आहे. यात ठोस इंधनाचा वापर केला जातो. पृष्ठभागावरून दुसऱ्या ठिकाणच्या पृष्ठभागावर मारा करणाऱ्या या मिसाईलचं वजन एक टनाहून अधिक आहे.
सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी एकात्मिक चाचणी क्षेत्र (आयटीआर)च्या प्रक्षेपण परिसर-४ पासून मोबाईल लॉन्चरच्या साहाय्यानं या मिसाईलला उडवलं गेलं.
मिसाईल प्रक्षेपणाच्या एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, बेटाच्या लॉन्चपॅडवरून उडवण्यात आल्यानंतर ही मिसाईल सकाळच्या कोवळ्या उन्हातच आकाशात सामावून गेली. शेपटाच्या बाजूकडून नारंगी आणि पांढऱ्या रंगाचा धूर निघताना दिसला. हे परिक्षण सुरक्षा वैज्ञानिक आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत पार पडलं.
या मिसाईलचं पहिलं परिक्षण १९ एप्रिल २०१२ रोजी करण्यात आलं होतं. आज करण्यात आलेलं परिक्षण या मिसाईलचं दुसरं परिक्षण आहे. सेनेत सामील झाल्यानंतर ही मिसाईल भारताच्या सीमा आणखी बळकट करू शकणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.