'दिल्ली गँगरेपसारख्या छोट्या घटनांचा पर्यटनावर मोठा परिणाम'

दिल्लीतल्या निर्भया बलात्कारासाठी ‘छोट्या गोष्टीमुळे’ देशातल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं, धक्कादायक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलंय. या वक्तव्य़ामुळं वाद निर्माण झालाय. 

Updated: Aug 22, 2014, 03:25 PM IST
'दिल्ली गँगरेपसारख्या छोट्या घटनांचा पर्यटनावर मोठा परिणाम' title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या निर्भया बलात्कारासाठी ‘छोट्या गोष्टीमुळे’ देशातल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं, धक्कादायक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलंय. या वक्तव्य़ामुळं वाद निर्माण झालाय. 

गुरुवारी देशातील पर्यटन मंत्र्यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना अर्थमंत्र्यांनी, ‘दिल्लीमधल्या निर्भाया बलात्काराच्या एका छोट्या घटनेला जगभरात दाखवलं गेलं आणि यामुळेच पर्यटनामध्ये आपल्याला अरबो डॉलर्सचं नुकसान झालंय’ असं वक्तव्य केलं. ‘पर्यटकांना बघण्यास आवडेल... असं देवानं आपणास  सर्व काही दिलंय... आपण योग्य दिशेनं जलदगतीनं पावलं उचलायला हवीत’ असंही त्यांनी यावेळी म्हटलं. पण, दिल्ली गँगरेप घटनेला ‘छोटी गोष्ट’ म्हणून त्यांनी केलेला उल्लेख अनेकांना अचंबित करून गेला.  

यावरूनच, काँग्रेसनंही जेटलींना टीकेचं लक्ष्य केलंय. बलात्कारासारख्या घटनेला छोटी घटना म्हणणं आणि त्याला पर्यटनाशी जोडणं हे निंदनिय असल्याचं राशिद अल्वींनी म्हंटलय. अरुण जेटलींच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेतच. 

निर्भयाचे वडील म्हणतात...
दिल्ली गँगरेप प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. या घटनेला बळी पडलेल्या ‘निर्भया’चे वडीलही जेटलींच्या या विधानावर नाराज आहेत. ‘देशाचा एक चांगला नागरिक गमावणं हे सुद्धा देशाचंच नुकसान असल्याची’ अशी सडेतोड प्रतिक्रिया देऊन त्यांनी आपला राग व्यक्त केलाय. 

चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर जेटलींनी लगेचच आपल्या वक्तव्यावर खुलासा दिलाय. महिलांवरच्या अत्याचाराबद्दल आपण नेहमीच आवाज उठवला असून या विषयाबाबत आपण संवेदनशील असल्याचं, सांगत त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ‘माझं विधान चुकीच्या पद्धतीनं घेतलं गेलं. बलात्काराच्या घटनेला मला छोटं म्हणायचा माझी कोणताही मानस नव्हता तसंच मला कुणाच्या भावनांना धक्काही लावयचा नव्हता... माझ्या या विधानामुळे कुणाला वाईट वाटलं असेल तर त्यासाठी क्षमा मागतो’ असं म्हणत जेटलींनी माफीही मागितलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.