www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
यापुढे तुम्ही जर वेटींग तिकीट घेऊन प्रवासाला निघत असाल तर टीटीई स्टाफ तुम्हाला कोणत्याही स्टेशनवर खाली उतरवून देऊ शकतो एव्हढच नाही तर तो तुमच्याकडून चांगलाच दंडही वसूल करू शकतो.
रेल्वे मंत्रालयानं हा आदेश दिलाय. त्यामुळे टीटीई स्टाफदेखील कामाला लागलंय. जुन्या नियमांनुसार रेल्वे रिजर्वेशन काऊंटरवरून तिकीट खरेदी करणारे प्रवासी वेटिंग तिकीटावरही प्रवास करू शकत होते. परंतू आता या नियमांत बदल करण्यात आलाय. यापुढे कोणत्याही वेटींग तिकीटाच्या साहाय्यानं रेल्वेमधून प्रवास करता येणार नाही. या अगोदर वेटिंग तिकीटाचा नियम केवळ ई-तिकीटांनाच लागू होता.
प्रवाशांना होणार फायदा
स्लीपर कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या नव्या नियमामुळे आरामात प्रवास करता येईल. वेटींग लिस्टमध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या गर्दीचा सामना त्यांना करावा लागणार नाही. एसीनंतर आता स्लीपर कोचच्या प्रवाशांनादेखील गर्दीपासून सुटकारा मिळण्यासाठी रेल्वेनं ही पावलं उचचली आहेत. परंतू, यामुळे रेल्वेचं प्रतिमहिना मोठं नुकसानदेखील होऊ शकतं.
सीट रिकामं असेल तरच वेटिंग तिकीट मान्य
सीट रिकामं असेल तर टीटीई स्टाफकडून वेटिंग तिकीट असणाऱ्या प्रवाशांना जागा मिळू शकते. परंतू, यासाठी त्यांना प्रवास सुरू करण्यापूर्वी टीटीशी संपर्क करावा लागेल. पण, रेल्वे भरलेली असेल तर वेटिंग तिकीट घेऊन तुम्हाला घरी परतावं लागेल.
प्रवाशांच्या मागणीनुसार बदल
प्रवाशांच्या मागणीनुसार नियमांमध्ये हे बदल करण्यात आले आहेत... आपलं सीट असेल तरी वेटींग तिकीट घेऊन येणाऱ्या प्रवाशांमुळे त्रास सहन करावा लागतो अशी तक्रार प्रवाशांनी नोंदविली होती. आपल्याच सीटवर ते कब्जा करतात. टीटीनं सांगितल्यानंतरही ते सीट खाली करत नाहीत आणि त्यामुळे वादही होतात, अशी तक्रार प्रवाशांनी नोंदविली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.