नवी दिल्ली : भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत एक भयंकर हॉरर किलिंगचं प्रकरण समोर आलंय. ही घटना दिल्लीच्या द्वारका भागात घडलीय.
मुलीनं आपला विरोध डावलून प्रियकराशी लग्न केल्यानं संतापलेल्या आई-बापानंच लग्नानंतर ७२ तासांतच मुलीला जाळून ठार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांना अटकही केलीय.
मुलीनं १२ नोव्हेंबर रोजी अभिषेक सेठ नावाच्या एका पंजाबी तरुणासोबत विवाह केला होता. मात्र, तिचे आई-वडील या लग्नानं खूश नव्हते. कारण होतं, मुलगा त्यांच्या जातीचा नव्हता... त्यामुळेच, मुलीच्या आई-वडिलांनी या विवाहाला मान्यता दिली नाही.
सुरुवातीपासूनच ते आपल्या लग्नाच्या विरोधात होते, असं म्हणत मृत मुलीच्या पतीनं – अभिषेकनं आपल्या सासू – सासऱ्यांवर मुलीच्या खुनाचा आरोप केलाय. ‘लग्नानंतर दोन दिवसांतच मुलीला तिच्या आईवडिलांनी आपल्या घरी बोलावून घेतलं... माझ्याकडे तिच्या चुलत भावाचा फोन आला की तिच्या आई-वडिलांनीच तिला जाळून ठार केलंय, असं अभिषेकनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.