नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशऩात सलग तिसरा दिवस गोंधळ सुरू आहे. गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभा आडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलीय.
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल दिलेल्या इशाऱ्यानंतर गोंधळ सुरूच होता. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप, घोषणाबाजी यामुळे प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. काँग्रेसनं सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
यावेळी, राहुल गांधींसह काँग्रेसचे तमाम खासदार आजही काळ्या फिती लावून आले होते. महाजन यांनी दिलेला इशारा त्यांनी साफ धुडकावल्याचं स्पष्ट दिसलं.
दुसरीकडे सत्ताधारी पक्षही अध्यक्षांचे आदेश मोडण्यात मागे नव्हता. राजस्थानातल्या भाजपा खासदारांनी रॉबर्ट वडेरांच्या विरोधात पोस्टरबाजी केली. या गोंधळामुळे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेत आजही विरोधकांनी ललित मोदी प्रकरणी स्थगन प्रस्ताव आणला. तो सभापतींनी स्वीकरला नाही. त्यामुळे डाव्या पक्षांसह सर्व विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे कामकाज होऊ शकलेलं नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.