कोलकाता : पश्चिम बंगालचे परिवहन मंत्री मदन मित्र यांच्या अटकेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन करतील, असं जाहीर करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मित्रंच्या अटकेवरून भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
‘सीबीआयनं आपली विश्वासार्हता गमावलेली आहे. सीबीआय राजकीय हत्यार बनली आहे. आता ही तपास संस्था गुंडाळण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या या राजकीय सूडभावनेच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे खासदार सोमवारपासून संसदेत आंदोलन पुकारणार आहेत’, असं बॅनर्जी म्हणाल्या. कोलकाता इथं शनिवारी तृणमूल काँग्रेसच्या रॅलीत त्या बोलत होत्या.
भाजपा आणि केंद्र सरकारनं आपल्या मर्यादेत राहावं, असा इशारा देताना बॅनर्जी म्हणाल्या, ‘बंगालची जनता अपमान सहन करणार नाही. सत्तेत असल्यामुळं ते (भाजपा) मुजोर झाले आहेत. या रॅलीत मी मुख्यमंत्री म्हणून आले नाही तर एक नागरिक म्हणून आले आहे. मदन मित्र हे चोर वा डाकू आहेत, यावर माझा विश्वास नाही. त्यांचे कुटुंबीय श्रीमंत आहेत, याचा अर्थ त्यांनी शारदा चिटफंडमधून पैसा घेतला आहे, असं नव्हे.’
मित्र यांना दिल्लीतून फोन आल्यानंतरच सीबीआयनं अटक केली.’
मोदींच्या अटकेची मागणी करावी काय?
‘शारदा समूहाचा अध्यक्ष सुदीप्ता सेन आणि मदन मित्र यांचं एका व्यासपीठावरील एकत्रित छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्याचा उल्लेख करून बॅनर्जी म्हणाल्या, ‘असं छायाचित्र जर गुन्हेगारी कटाचा पुरावा ठरत असेल तर सहारा घोटाळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अटक करण्यात आली पाहिजे.
‘चिटफंड कंपनीच्या मालकांसोबत अनेक माकप नेत्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत. सहारा प्रमुखासोबत मोदींचा फोटो आहे. मग सीबीआयनं मोदींना अटक करावी, अशी मागणी आम्ही करायची काय?’
तर शारदा घोटाळ्यात ‘आपला सहभाग’ उघड होण्याची शक्यता असल्यामुळं ममता बॅनर्जी या कमालीच्या घाबरलेल्या आहेत, असं भाजपानं म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.