नवी दिल्ली : बिस्कीट हा असा खाद्यपदार्थ आहे जो कधीही, केव्हाही खाल्ला जातो. विशेषत: चहाच्या वेळेस नाश्ता म्हणून अनेक घरांमध्ये बिस्किटेच खाल्ली जातात.
देशभरात दरवर्षी तब्बल 36 लाख टन बिस्कीटे खाल्ली जातात. यात सर्वाधिक बिस्कीटे खाणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात एका वर्षात तब्बल 1.09 लाख टन बिस्कीटे खाल्ली जातात. तर सर्वाधिक कमी बिस्कीटे पंजाब आणि हरयाणा राज्यातील लोक खातात.
बिस्कीट मॅन्यूफॅक्चरर्स वेलफेयर असोसिएशननुसार देशात गेल्यावर्षी 36 लाख टन बिस्कीटांची विक्री झाली. यात दरवर्षी 8 ते 10 टक्क्यांनी वाढ होत असते. असोसिएशनचे अध्यक्ष हरेश दोषींनी दिलेल्या माहितीनुसार लोक आता नाश्ता, डाळ-भात खाण्याइतकेच बिस्कीटे खाण्याला प्राधान्य देत असल्यामुळे त्यांची विक्री वाढलीये. स्वातंत्र्याआधीच्या काळात केवळ ग्लुकोज बिस्कीटे उपलब्ध होती मात्र आता विविध प्रकारांची बिस्किटे उपलब्ध आहेत.
सर्वाधिक बिस्कीटे खाणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक लागतो तो उत्तर प्रदेशचा. येथे वर्षाला एक लाख 85 हजार टन बिस्कीटांची विक्री होते. तामिळनाडूमध्ये 1 लाख 11 हजार, पश्चिम बंगालमध्ये 1 लाख दोन हजार, कर्नाटक 93 हजार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 80 हजार, बिहार आणि झारखंडमध्ये 62 हजार, गुजरातमध्ये 72 हजार बिस्कीटे खाल्ली जातात.