मुंबई : ‘युनायटेड बँक ऑफ इंडिया’नं किंगफिश एअरलाइन्सचा प्रमोटर विजय माल्ल्याचे पंखच छाटलेत. विजय माल्याला ‘विलफूल डिफॉल्टर’ अर्थातच ‘जाणून-बुजून कर्ज बुडवणारा’ म्हणून घोषित करण्यात आलंय.
बँकेचे कार्यकारी संचालक दीपक नारंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय माल्या आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या अन्य तिघा निर्देशकांना विलफूल डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात आलंय.
या सर्वांना आपली बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला गेलाय. त्यांना कंपनीच्या संचालक पदावरून पायउतारही व्हावं लागू शकेल. तसंच गरज पडल्यास या सर्वांवर न्यायालयीन खटलाही दाखल केला जाऊ शकतो.
समितीनं घेतलेल्या निर्णयाची माहिती अर्थ मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक आणि सेबीलाही देण्यात आलीय... त्यामुळे, या सर्वांवर योग्य ती कारवाई करणं शक्य होईल, असंही दीपक नारंग यांनी म्हटलंय.
कोलकाता हायकोर्टानं माल्या आणि इतरांना विलफूल डिफॉल्टर घोषित करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर बँकेनं हे पाऊल उचललंय.
किंगफिशर एअरलाईन्सला युनायटेड बँकेचं जवळपास 350 करोड रुपयांचा कर्ज अजून फेडायचंय. तसंच भारतीय स्टेट बँकेंतर्गत येणाऱ्या कंसोर्शियमचंही जवळपास 7500 करोड रुपयांचं कर्ज किंगफिशला फेडायचंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.