www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू
कर्नाटकातल्या एका ६१ वर्षांच्या मंत्र्यांनी तलावामध्ये उडी मारून बुडणाऱ्या कारमधल्या सहा जणांना वाचवण्याचा पराक्रम केला आहे. मंगळवारी हा प्रकार बेंगळुरूजवळ घडला.
शालेय मंत्री किम्मन रत्नाकर आपल्या गाडीतून तिर्थहाली या शहरातून बेंगळुरूकडे येत होते. त्यावेळी त्यांना तलावामध्ये एक गाडी बुडताना दिसली. त्यांनी लगेच आपली गाडी थांबवायला सांगितली. किम्मान त्यांचा अंगरक्षक हलस्वामी, चालक चंद्रशेखर आणि कृष्णमूर्ती यांनी तलावामध्ये उड्या मारल्या. बुडत्या गाडीमध्ये सहाजण अडकले होते आणि ते खिडकीतून हात बाहेर काढून मदतीची अपेक्षा करत होते. गाडीचा मागचा दरवाजा उघडून तिथून तीन लहान मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर उरलेल्या तीन मोठ्या माणसांनाही वाचवण्यात आले, ज्यामध्ये ५५ वर्षांच्या एका महिलेचाही समावेश होता.
उदयकुमार व त्याचे कुटुंबिय यांच्यावर ही वेळ ओढवली होती, पण आता सगळे सुखरूप आहेत. किम्मन यांनी लगेच डॉक्टर बोलावून त्यांच्यावर उपचारही केले. रत्नाकर यांचे धन्यवाद कसे मानायचे हे समजत नसल्याची भावना उद्यकुमार व त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.