बरेली : एखाद्या माकडाला गाडी चालवताना तुम्ही आत्तापर्यंत सिनेमातच पाहिलं असेल पण, उत्तरप्रदेशात मात्र खरंखुरं एक स्मार्ट माकड पाहायला मिळालं.
सोमवारी दुपारी पीलीभीतमध्ये ही घटना घडली. उत्तरप्रदेश राज्य परिवहन निगमची एक बस पार्किंगमध्ये उभी होती. ही गाडी इथं प्रवाशांसाठी अर्धा तास थांबणार होती. त्यामुळे, एव्हढ्या वेळात ड्रायव्हरनं एक डुलकी काढायचं ठरवलं... आणि त्यानं मागची सीट गाठली.
एवढ्यात एक माकड या बसमध्ये ड्रायव्हर केबिनमध्ये शिरलं. चावी बसलाच लावलेली होती. माकडानं केलेल्या चाळ्यांमुळे अचानक बसचं इंजिन सुरू झालं. आणि गाडी सुरू झाली. ड्रायव्हरच्या सीटवर माकडाला पाहून प्रवासीही घाबरले.
बसचं इंजिन सुरू झाल्यानं चालकाची झोपही उडाली... आणि त्यानं धावत-पळत ड्रायव्हरची केबिन गाठली. माकडाला हाकलण्याच्या नादात माकडानं दुसरा गिअरही टाकला... आणि टुनकन बाहेरही उडी घेतली.
एवढ्या वेळेत बसनं आणखी दोन बसला धडक दिली होती. पण, सुदैव म्हणून या घटनेत कुणालाही काही इजा झाली नाही.