www.24taas.com, नवी दिल्ली
म्यानमारच्या विरोधी पक्षाच्या नेत्या आंग सान सू की अनेक वर्षांनंतर आज दिल्लीत दाखल झाल्यात. म्यानमारमध्ये लोकशाही आणि बहुपक्ष राजकीय प्रणाली लागू करण्यासाठी गेली कित्येक वर्ष झटत आहेत.
आंग सान सू की यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारतभेटीचं निमंत्रण दिलं होतं. त्या उद्या जवाहरलाल नेहरू मेमोरिअल लेक्चर देणार आहेत. परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी स्वत: विमानतळावर उपस्थित राहून सू की यांचं भारतात स्वागत केलं. परराष्ट्र विभागाचे प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, उभय देशांमधील परस्परसंबंधांवर सू की या प्रकाश टाकणार आहेत. यावेळ अनेक विषयांवर विचारांचं आदान-प्रदान करण्याचा सू की यांचा हेतू आहे.
आपल्या एक आठवड्याच्या भारत दौ-यादरम्यान सू की या लेडी श्री राम महाविद्यालयालाही भेट देणार आहेत. इथं त्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशीही संवाद साधणार आहेत. सू की यांनी याच महाविद्यालयात शिक्षण घेतलंय. लहानपणीची काही वर्ष त्यांनी भारतात व्यतीत केलेले आहेत. १९८७ साली त्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स स्टडी इन शिमला’ मध्येही पदवी प्राप्त केलीय.