मोदींना बुरे तर नितीशकुमारांना अच्छे दिन!

'हम मोदीजीको लानेवाले है... अच्छे दिन आनेवाले है...!' या गाण्याने शिखरावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बुरे दिन दिसत आहेत. या गाण्याचा निर्माता आणि मोदींसाठी काम करणारा तरुण चेहरा आता बिहाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठिशी राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना अच्छे दिन येण्याचे संकेत मिळालेत.

Updated: May 20, 2015, 04:22 PM IST

नवी दिल्ली : 'हम मोदीजीको लानेवाले है... अच्छे दिन आनेवाले है...!' या गाण्याने शिखरावर पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बुरे दिन दिसत आहेत. या गाण्याचा निर्माता आणि मोदींसाठी काम करणारा तरुण चेहरा आता बिहाचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पाठिशी राहणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना अच्छे दिन येण्याचे संकेत मिळालेत.
 
लोकसभा निवडणुकीत मोदी हवा देशात पोहोचविणारा तरुण चेहरा प्रशांत किशोर चर्चेत नव्हता. मात्र, त्याने मोदींची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींची साथ सोडून तो बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा हायटेक प्रचार करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदी यांच्या नावाची हवा प्रशांत किशोर याने गितामधून निर्माण केली होती. पण या गीताआधी गुजरातचे विकासक आणि सुशासक म्हणून मोदी यांचे नाव देशभरात नेले ते प्रशांत किशोरने. मोदींना पंतप्रधानपदाच्या गादीवर बसविण्यात सिंहाचा वाटा उचलणारा हाच तरुण आता नितीशकुमारांची प्रतिमा बनविण्यास सज्ज झाला आहे. बिहार विधानसभेच्या येत्या निवडणुकीत प्रशांत नितीशकुमारांसाठी काम करणार आहे.

अमेरिकेतील पॉलिटिकल अॅक्शन कमिटीच्या धर्तीवर 'सिटिझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स' ही संघटना स्थापन करणारा प्रशांत आता बिहारमध्ये नितीशकुमारांसाठी काम करणार आहे. मोदी यांच्या प्रचारकार्यासाठी २०११ मध्ये प्रशांतने संयुक्त राष्ट्रसंघातील नोकरीचा राजीनामा दिला होता. मोदी मुख्यमंत्री असताना त्याने मोदींच्या निवासस्थानी राहून काम केले होते. मोदींच्या 'चाय पे चर्चा' व 'थ्री-डी होलोग्राम' प्रचारात प्रशांतच्या टीमचा मोठा वाटा होता. त्याच्या प्रयत्नांमुळेच लोकसभा निवडणुकीत मोदींचा हिंदुत्ववादी चेहरा मागे पडून उदारमतवादी प्रतिमा निर्माण झाली होती. मात्र, मोदींच्या विजयानंतर प्रशांतच्या संघटनेला फारसं श्रेय मिळाले नसल्याची चर्चा होती.

बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमार यांच्या बाजूने प्रशांतची एन्ट्री अनोख्या प्रचारयुद्धाची नांदी ठरणार आहे. गणिती विश्लेषण, ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन यावर प्रशांत यांच्या प्रचाराचा भर असेल, असे समजते. नितीशकुमार यांचे सल्लागार पवन वर्मा यांनी प्रशांत नितीश कुमारांच्या साथीला येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. दरम्यान, प्रशांतने मात्र यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.