नवी दिल्ली : गेल्या दशकात भारताने अंतराळ क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे भारताकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष आहे. भारताने कमी पैशात केलेल्या भरीव कामगिरीमुळे आता जगाला भारताकडून अनेक अपेक्षा आहेत. अमेरिकी अंतराळ संस्था 'नासा'ने आता भारताला भविष्यातील मंगळावरील मानव मोहिमेसाठी भारताच्या 'इस्रो'ला आमंत्रण दिले आहे.
भारत हा जगातील असा पहिला देश ठरला ज्याची मंगळ मोहिम पहिल्या प्रयत्नात यशस्वी ठरली. तेव्हापासून स्वस्त आणि विश्वासार्ह तंत्रज्ञानासाठी जगातील अनेक देश भारताकडे आशेने पाहात आहेत.
नवी दिल्लीतील अमेरिकन सेंटरमध्ये 'नासा'ने मंगळावरील केलेल्या संशोधनाविषयी बोलताना 'नासा'चे वैज्ञानिक चार्ल्स एलाकी म्हणाले "आम्ही मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची आशा करतोय. ते करण्यापूर्वी आम्हाला काही तयारी करावी लागेल. पुढील महिन्यात वॉशिंग्टन येथे एक बैठक आहे. भविष्यातील मोहिमांविषयी चर्चा करण्यासाठी 'इस्रो'लाही आमंत्रित करण्यात आले आहे. यात जगातील अनेक देश सहभागी होतील."
'नासा' आणि 'इस्रो' अनेक मोहिमा एकत्रित करण्याच्या प्रयत्नात आहेत. २०२० पर्यंत वातावरण बदलाचा अभ्यास करणारी एक यंत्रणाही संयुक्तरित्या तयार केली जाणार आहे. २०२०-३०च्या दशकात अंतराळवीर मंगळावर पाठवण्याचे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. त्यामुळे पुढील दशकात भारतीय अंतराळवीराने मंगळावर आपल्या पावलाचा ठसा उमटवला तर आश्चर्य वाटायला नको.