अहमदाबाद : वादग्रस्त आध्यात्मिक गुरू आसाराम यांच्या एका अनुयायाला तीन साक्षीदारांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
आसाराम तसेच त्यांचा मुलगा नारायण साई यांच्या विरोधात दाखल केलेल्या बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमधील ३ साक्षीदारांची हत्या झाली. यातील प्रमुख आरोपी आणि आसाराम बापू याचा अनुयायी कार्तिक हलदार याला करण्यात आली, तो छत्तीसगजमधील रायपूरचा रहिवासी आहे.
साक्षीदारांच्या खुनातील प्रमुख आरोपी कार्तिक हलदर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंडमधून दहा गावठी पिस्तुले, १२ बोअरचे एक पिस्तूल, एक ९ मिमीचे गावठी पिस्तूल आणि ९४ काडतुसे मिळविली होती.
साक्षीदारांचे मारेकरी असे सापडले
गुजरातमधील एटीएस आणि अहमदाबाद येथील गुन्हे शाखेच्या संयुक्त मोहिमेत हलदार याला अटक केली. अमृत प्रजापती, कृपालसिंग आणि अखिल गुप्ता या साक्षीदारांचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याशिवाय अन्य चार जणांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली हलदरने दिली आहे.
अमृत प्रजापती याच्या खुनानंतर आसाराम यांच्या भक्तांनी हलदरला २५ लाख रुपये दिले होते. आसाराम आणि नारायण साई यांच्याविरोधात अहमदाबाद, सुरत आणि जोधपूर येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांत या तिघा साक्षीदारांनी त्यांच्याविरोधात न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे साक्ष दिली होती.
साक्षीदारांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रवीण वकील, के. डी. पटेल, संजय जोधपूर आणि मोहन किशोर या आसाराम यांच्या माणसांकडून त्याच्या वतीने सूचना मिळत होत्या.
आसाराम यांना जोधपूर न्यायालयातून तुरुंगात नेत असताना आपण त्याची भेट घेतली असल्याची कबुलीही हलदरने दिली असल्याची माहिती 'एटीएस'चे प्रमुख आणि गुन्हे शाखेचे पोलिस महासंचालक जे. के. भट यांनी दिली. यावरून या साक्षीदारांच्या खुनात आसाराम यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातील पुरावे आम्ही गोळा करीत आहोत, असे ते म्हणाले.