www.24taas.com, नवी दिल्ली
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना पदमभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज दिल्लीत झाली. पाडगावरांना पद्मभूषण देऊन त्यांचा उचित गौरव करण्यात आल्याची प्रतिक्रिया साहित्य विश्वात उमटल्या आहेत.
वयाच्या १४ व्या वर्षापासून गेली सात दशकं मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करणार्याा मंगेश पाडगावकर यांचा `छोरी` हा कवितासंग्रह १९५० प्रसिद्ध झाला होता. जिप्सी, सलाम हे त्यानंतरचे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह तर मीरा आणि कबीर यांच्या काव्याचा भावानुवाद त्यांनी केला. तसंच `बायबल`चा मराठी अनुवादही त्यांनी केला. आकाशवाणी रेडिओचे निर्माते म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. महाराष्ट्रातल्या काव्य रसिकांना कविता कशी जगावी याचा अनुभव मंगेश पाडगावकर आणि विं. दा. करंदीकरांनी कवितांच्या जाहीर मैफिली सादर करून दिला आणि याच कर्तृत्वाचा गौरव करत मंगेश पाडगावकरांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.