केजरीवालांच्या अराजकतेवर राष्ट्रपती बरसले!

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 26, 2014, 08:03 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या आंदोलनावर प्रहार करत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सुनावलं. सरकार म्हणजे दात्यांचं दुकान नाही आणि `लोकप्रिय अराजकता` प्रशासनाची जागा कधीही होऊ शकत नाही, असं राष्ट्रपती म्हणाले.
तीन ते चार महिन्यांवर आलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर `मतदार` नागरिकांना राष्ट्रपतींनी स्थिरतेची वाट दाखवण्याचा प्रयत्न केला.केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या विरोधात केलेल्या दोन दिवसांच्या धरणं आंदोलनाचा संदर्भ घेत मुखर्जी यांनी त्यांचं नाव न घेता टीका केलीय. `निवडणुकांमुळं कोणत्याही व्यक्तीला भ्रमात राहण्याचा परवाना मिळत नाही,` असं ते म्हणाले.
दरम्यान, भ्रष्टाचार हा लोकशाहीला पोखरणारा कॅन्सर असून, तो देशाच्या पायालाच दुर्बल करीत आहे, असंही मुखर्जी यांनी भाषणादरम्यान म्हटलं. `सार्वजनिक जीवनात ढोंगीपणा वाढत आहे. ज्यांना मतदारांचा विश्वास हवा असतो, त्यांनी जे शक्य असतं तेच आश्वासन द्यावं,` असं सांगून `सरकार हे दात्यांचं दुकान नाही. लोकप्रिय अराजकता सरकारची जागा घेऊ शकत नाही. खोटी आश्वासनं भ्रमनिरास करतात आणि रोषाला जन्म देतात,` असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, शिक्षण हा वैश्विक हक्क आहे, असंही मुखर्जी यांनी म्हटलंय. देशाची स्थिरता, प्रामाणिकपणा आणि विकासासाठी आपली बांधिलकी हवी, असं सांगून जातीयवादी शक्ती आणि दहशतवाद्यांनी देश आणि देशवासीयांमधील एकात्मता नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तरी ते फोल ठरेल, असंही त्यांनी नमूद केलं.
आगामी निवडणुकांमध्ये मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून स्थिर सरकारला कौल द्यावा. अस्थिर सरकारमध्ये देशात आपत्तीला निमंत्रण ठरेल, अशी जाणीव त्यांनी करून दिली. गेल्या काही वर्षांतील अस्थिर आणि वादग्रस्त राजकारण संपुष्टात आणण्याची ही संधी आहे. विजय कुणाचाही होवो, मात्र देशात स्थिरता, विकास आणि प्रामाणिकपणा यांची निवड व्हायला हवी, असं त्यांनी नमूद केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ