www.24taas.com, मुंबई
दुसरं लग्न केलं तरी पहिल्या बायकोला तुम्हांला पोटगी ही द्यावीच लागणार आहे. दुसरे लग्न केले म्हणून मुस्लिम पुरुषाला कोणत्याही परिस्थितीत पहिल्या बायकोची पोटगी थांबवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. त्याचप्रमाणे पोटगीच्या रकमेतही तो कपात करू शकत नाही, असेही न्यायमूर्ती रोशन दळवी यांनी यावेळी स्पष्ट केले.
दुसरे लग्न केले म्हणून पहिल्या पत्नीला एकूण पगाराच्या फक्त एक चतुर्थांश एवढी रक्कम पोटगी म्हणून देण्याच्या कुटुंब न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध एका मुस्लिम महिलेने दाखल केलेल्या अपील अर्जाच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती दळवी यांनी हे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच पोटगीची रक्कम दुप्पट म्हणजेच पगाराच्या पन्नास टक्के इतकी केली. न्यायमूर्ती दळवी यांच्या या निकालामुळे या महिलेला आता दरमहा १८ हजार रुपये पोटगी मिळणार आहे.
या महिलेने दाखल केलेल्या अर्जावर निकाल देताना कुटुंब न्यायालयाने मासिक ३२ हजार पगार घेण्यात सॉफ्टवेअर इंजिनीअरला त्याच्या पहिल्या पत्नीला एक चतुर्थांश म्हणजेच मासिक ७ हजार ९०० रुपये पोटगी देण्याची सवलत दिली होती. परंतु न्यायमूर्ती दळवी यांनी हा निर्णय अमान्य केला.