बंगळुरू : कावेरीचं पाणी सोडण्यावरून कर्नाटकमध्ये आंदोलनं सुरु झाली आहेत. बंगळुरूमध्ये या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं आहे. बंगळुरूच्या केपीएन बस डेपोमध्ये आंदोलकांनी 56 बस जाळल्या आहेत. याबरोबरच आंदोलकांनी काही वाहनांनाही जाळलं आहे.
कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या या आंदोलनाचे पडसाद तामीळनाडूमध्येही उमटले आहेत. चेन्नईमध्ये तामीळ आंदोलनकर्त्यांनी एका कर्नाटकी मालक असलेल्या हॉटेलवर हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. आणखी हिंसाचार टाळण्यासाठी तामीळनाडूमधल्या कानडी शाळांना अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.
तर कर्नाटकमध्ये राहणाऱ्या तामीळ नागरिकांवर आणि त्यांच्या संपत्तीवर हल्ले होऊ नयेत म्हणून कर्नाटक सरकारनंही सुरक्षा वाढवली आहे. कर्नाटकमधून तामीळनाडूला 20 सप्टेंबरपर्यंत कावेरी नदीचं 12 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.