नवी दिल्ली : आरटीआय कार्यकर्ता आणि ‘आप’चा नेता चंद्रमोहन शर्मा यानं प्रेम मिळवण्याच्या नादात एका मानसिक रुग्णाला आपल्या गाडीतच जाळल्याचा धक्कादायक सत्य समोर आलंय.
गाडीनं अचानक पेट घेतल्यानं झालेल्या अपघातात चंद्रमोहन शर्मा याचा मृत्यू झालाय असं समजलं गेलं होते. पण, चार महिन्यानंतर त्याला बंगळुरूमधून जिवंत अटक करण्यात आली. यावेळी, त्याच्यासोबत त्याच्या प्रेयसीही पोलिसांना आढळली. चंद्रमोहन हा विवाहीत असून पत्नीपासून त्याला दोन मुलंही आहेत.
स्वत:च्याच मृत्यूचा बनाव चंद्रमोहननं रचल्याचं त्याला अटक झाल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं. वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रियेन्द्र सिंह यीं दिलेल्या माहितीनुसार, एका मानसिक रुग्णाची हत्या करून त्याचं शव आपल्या कारमध्ये टाकून चंद्रमोहननं गाडीला आग लावून दिली होती.
यानंतर, चंद्रमोहन आपल्या प्रेयसीसोबत बंगळुरुमध्ये दुसऱ्याच एका व्यक्तीच्या नावानं नोकरीही करत होता. या संपूर्ण प्रकरणात चंद्रमोहनला त्याचा एक नातेवाईक मदत करत होता. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
चंद्रमोहनच्या प्रेयसीच्या मोबाईलनंबरवर जेव्हा पोलिसांचं लक्ष गेलं तेव्हा त्यांनी या नंबरवर येणाऱ्या – जाणाऱ्या कॉल्सची डिटेल्स घेतल्या. त्यानंतर, पोलिसांनी चंद्रमोहनला बंगळुरूहून अटक केली.
सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमोहन आणि त्याच्या पत्नीचे संबंध तणावपूर्ण होते. आपल्या पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी चंद्रमोहननं एका मानसिक रुग्णाचं अपहरण करून त्याला आपल्या कारमध्ये बसवून गाडीलाच आग लावून दिली. यावेळी, शर्मानं गाडीत आपलं पॉकेट आणि कपडेही सोडले होते. पोलिसांनीही या घटनेत चंद्रमोहनचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.