मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिजला सेबीनं मोठा दणका दिलाय. सेबीनं 2007 साली केलेल्या इनसाईडर ट्रेडिंगच्या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज आणि 12 इतर कंपन्यांना एक वर्षासाठी वायदे बाजारातून हद्दपार केलंय.
याबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीजला जवळपास 445 कोटी रुपये दंड करण्यात आलाय. या दंडावर दरवर्षी 12 टक्के दरानं 10 वर्षांचं व्याजही रिलायन्सला भरावं लागणार आहे. त्यामुळे एकूण दंडाची रक्कम 1 हजार कोटींच्या घरात जाणार आहे.
दंडाची रक्कम भरण्यासाठी सेबीनं रिलायन्सला 45 दिवसांची मुदत दिलीय. याच काळात सेबीच्या निर्णयला सिक्युरिटीज अॅपलेट ट्रायब्यूनलमध्ये आव्हान देणार असल्याचं रिलायन्सनं म्हटलंय. सेबीनं लादलेली बंदी अन्यायकारक असल्याचं रिलायन्सचं म्हणणं आहे. शिवाय आम्ही वरच्या न्यायाधिकारणांमध्ये सेबीच्या निर्णयांना आव्हान देऊ असंही कंपनीनं स्पष्ट केलंय.