www.24taas.com, नवी दिल्ली
तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या सूरात आता राष्ट्री्य लोकशाही आघाडीचे संयोजक शरद यादव यांनी सूर मिळविले आहेत. त्यांनी ममतांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ममता यांनी शरद यादव यांना कार्यक्रमात बोलावून एनडीएत जाण्याची तयारी दाखविल्याचे दिसून येत आहे.
किराणामध्ये थेट परकीय गुंतवणुक (एफडीआय)च्या विरोध करण्यासाठी तृणमूल काँग्रेसने आयोजित केलेल्या निदर्शनात शरद यादव यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते. ममता दिदी या बंगालच्या शेरणी नाहीत तर देशाच्या शेरणी आहेत, असा उल्लेखही यादव यांनी यावेळी केला. ममता बॅनर्जी यांनी जनतेविरोधात निर्णय घेणा-या सरकारमधून बाहेर पडल्याने त्यांचे स्वागतही शरद यादव यांनी केले.
यादव यांनी पाठिंबा देताना म्हटले, तुमच्या पाठिशी आहोत. ममता दीदींना आमचा पूर्ण पाठिंबा असून आवश्ययक ती मदत आम्ही त्यांना देऊ, असा विश्वास यादव यांनी यावेळी दाखविला. ममता यांनी आपल्या सहा मंत्र्यांचे राजिनामे देऊन सामान्य माणसांसाठी लढा दिला हे स्वागतार्हच आहे, असे उद्गार यादव यांनी काढले.